नाशिकमध्ये ‘स्त्री शक्ती’ राज्यस्तरीय नवरात्र महोत्सव व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न!नाशिकमध्ये ‘स्त्री शक्ती’ राज्यस्तरीय नवरात्र महोत्सव व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न!
संपादक सुनिल संपतराव घुमरे नासिक एअर पोर्ट जानोरी
नाशिक (विशेष प्रतिनिधी):
समाजात निरनिराळ्या क्षेत्रांत उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच समाजासमोर त्यांचा आदर्श ठेवण्यासाठी ‘श्री योग ग्लोबल फाउंडेशन, नाशिक’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंगल कार्यालय, नाशिक’ यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून ‘स्त्री शक्ती’ राज्यस्तरीय सोहळा तथा सन्मान सोहळा २०२६ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. चित्रमंदिर थिएटरमागे, मेन रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंगल कार्यालयात या सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीकांत केशव गीते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपक्रमामागील भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. या राज्यस्तरीय सोहळ्यात समाजमनात व आपापल्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीकांत केशव गीते, कार्याध्यक्ष श्री. अविनाश वाळुंजे आणि सचिव श्री. ज्ञानेश्वर शेषराव सुरासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका सौ. कुंदा जयवंत बच्छाव यांनी आपल्या मनोगतात आयोजकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि महिलांनी आपली स्वप्ने जपून स्वतःचा सन्मान स्वतः करायला शिकले पाहिजे अशी प्रेरणादायी भावना व्यक्त केली. तसेच ज्येष्ठ समाजसेविका सौ. अश्विनीताई बोरस्ते यांनी ‘श्री योग ग्लोबल फाउंडेशन’ आणि ‘साप्ताहिक पक्षप्रमुख’ वृत्तपत्राच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमाची व विविध क्षेत्रांतील महिलांच्या कार्याचा परिचय करून दिल्याबद्दल प्रशंसा केली. माजी आमदार श्री. नितीन (नाना) भोसले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण सोहळ्याचे सुरेख सूत्रसंचालन गायत्री यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्था कार्याध्यक्ष श्री. अविनाश वाळुंजे यांनी आभार प्रदर्शन केले. या सोहळ्यास नाशिक शहर व परिसरातील नागरिक, महिला व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
